Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए अतुल पाटणकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट अतुल पाटणकर यांचे 7 जुलै 2021 रोजी निधन झाले.

वयाच्या 53 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी 4.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, बहिण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह सर्व अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वित्त अधिकारी म्हणून त्यांनी अडीच वर्षे कामकाज पाहिले. स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. त्यांच्या जाण्याने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र पाटणकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक स्थगित करण्यात आली. ही बैठक पुढील काळात घेण्यात येईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने सीए अतुल पाटणकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जाण्याने विद्यापीठाची तसेच माझीही न भरून येणारी हानी झाली आहे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.