Pune News : पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद राहणार !

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा 13 डिसेंबर पर्यत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने 1 डिसेंबर पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला. परंतु शाळा सुरू ठेवाव्यात की बंद याबाबत निर्णय घेण्यामध्ये पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था गोंधळाची स्थिती होती.

दरम्यान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड 19 चाचणी करण्यास सुरुवात झाली होती. तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात लेखी संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

त्यातच शाळा सुरू करु नका याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांनी विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने उशिरा का होईना शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात स्पष्टीकरण देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आगामी काळात शहर आणि उपनगरातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. सद्य:स्थितीत महापालिकेतील अधिकारी, शिक्षक, पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.