Pune News : ‘हम अँटिकरप्शन के लोग है’ असे म्हणत जेष्ठ नागरिकाला लुटले 

एमपीसी न्यूज – अँटिकरप्शनची माणसं असल्याचे सांगून एका जेष्ठ नागरिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर भागात घडला‌. ही घटना बुधवारी (दि.6) दुपारी साडे बाराच्या सुमारास कर्वेनगर येथील युनायटेड वेस्टर्न सोसायटी येथे घडली. 

याप्रकरणी 77 वर्षीय जेष्ठ नागरिकाने आलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्वेनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान त्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. येथे ते आले होते. तेथील काम झाल्यानंतर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास परत घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मधु संचय गणपती मंदिरासमोर दोघांनी त्यांना अडवले.

तसेच ‘लो हमारे सहाब उधर खडा है, साहब को मिलो तुमको मालूम नही क्या, सोना पहन के घुमना नही.’ ‘हम अँटिकरप्शन के लोग है, आपकी सुरक्षा के लिये है,’ असे म्हणत त्यांच्यासमोर एकाच्या थोबाडीत मारल्याचे नाटक केले. आणि त्यांना गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी व घड्याळ काढून ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर ते रुमालात ठेवायला घेऊन रुमालात ठेवल्याचे भासवत रुमालात फक्त घड्याळ ठेवले आणि हा रुमाल त्यांच्या पिशवीत ठेवला व त्यांना जाण्यास सांगितले. फिर्यादी यांनी काही अंतरावर गेल्यावर रुमाल पाहिला त्यावेळी त्यात फक्त घड्याळ असल्याचे निदर्शनास आले व आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.