Pune News : बुस्टर डोसला ज्येष्ठांचा सर्वाधिक प्रतिसाद
एमपीसी न्यूज – शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधित बुस्टर डोसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर 1.24 लाख ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतला असून, त्याची टक्केवारी 70 आहे. सहा ते 11 वयोगटातील मुलांचे लसीकरण राज्य शासनाच्या आदेशानंतर सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. शहरात 1 लाख 77 हजार नागरिकांनी तिसरा म्हणजेच बुस्टर डोस घेतला आहे. यापैकी सर्वाधिक बुस्टर डोस इतर वयोगटांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांनी (1.24 लाख) घेतला असून, त्याचे प्रमाण 70 टक्के इतके आहे. सध्या दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, अशा 18 वर्षांपुढील नागरिकांना तिसरा म्हणजेच बुस्टर डोस देण्यात येतो. यामध्ये 18 ते 45 वयोगटात 2 हजार 383, पंचेचाळीस ते 60 वयोगटात 9 हजार 686 आणि 60 आणि त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठांची संख्या 1 लाख 24 हजार आहे.
मुलांचे लसीकरण शासनाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने देशातील सहा ते 11 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्याप त्या संदर्भातील आदेश स्थानिक पातळीवर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या संदर्भात नियोजन करण्यात आलेले नाही. शहराची अंदाजित लोकसंख्या 42 लाख इतकी आहे. त्यातील 9.68 टक्के लोकसंख्या 6 ते 11 वयोगटातील बालकांची आहे. याबाबतचे निकष केंद्र आणि राज्य सरकारने जारी केले आहेत. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. आम्ही शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आदेश आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होईल, तेव्हा महापालिकेच्या शासकीय केंद्रातून लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
|