Pune News : ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश गांधी यांना ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’

एमपीसी न्यूज –  ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांना बंधुता परिवाराच्या वतीने दिला जाणारा पहिलाच ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते २ जून रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित काव्यमहोत्सवात गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे,  प्रसिद्ध साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.

 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी या संस्थांच्या वतीने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बंधुतादिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधून या दिवशी एकदिवसीय बंधुता काव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

ज्येष्ठ निवेदक कवी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी सिराज शिकलगार (सांगली) यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. माधवी खरात व प्रकाश जवळकर उपस्थित राहतील. काव्य महोत्सवाच्या संयोजनासाठी प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे, संगीता झिंजुरके आणि प्रा. अनंत सोनवणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

 

दुपारच्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन होईल. ३० पेक्षा अधिक निमंत्रित यात सहभागी होतील. स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. तसेच नारायण खेडकर (सिल्लोड) यांना ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य’ पुरस्कार,  नामदेव जाधव (पलूस) यांना ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य’ पुरस्कार, दिनेश मोडोकर (पाथर्डी) यांना ‘बंधुता प्रकशगाथा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

 

पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल. त्यामध्ये प्रदीप इक्कर (जालना), मिलिंद घायवट (ठाणे), गोपाळ कांबळे (पुणे), कुशल राऊत (अकोला), अमोल घटविसावे (अहमदनगर), तुकाराम कांबळे (नांदेड), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड) यांना ‘बंधुता शब्दक्रांती’ पुरस्काराने, तर प्रवीण देवरे (मुंबई), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), विनोद सावंत (पलूस), राजेश साबळे (ठाणे), मनोहर कांबळे (खेड), पल्लवी पतंगे (मुंबई), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विद्या अटक (पुणे) यांना ‘बंधुता मायमराठी’ पुरस्कराने गौरविण्यात येईल, असे रोकडे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.