Pune News : महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय येत्या आठवडा भरात होण्याची शक्यता आहे, लवकरच याबाबतची घोषणा पालिकेच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.

1 जानेवारी 2016 पासून केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला.यानंतर 2 ते अडीच वर्षांआधी राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला आहे. याप्रमाणे, पिंपरी-चिंचवड पालिकेत सुमारे वर्षभरापूर्वी पासून वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झालीय. परंतु, पुणे पालिकेतील वेतन आयोग लागू झाला नाही.

पालिकेच्या वर्ग 1 आणि वर्ग 4 मध्ये साधारण 16 हजार कर्मचारी सेवेत आहेत. त्यांचा प्रति महिना वेतन सुमारे ८० कोटी पालिका खर्च करते. तसेच, सातवा वेतन आयोगाला मान्यता मिळाल्यावर साधारण 23 % यात वाढ होणार आहे. मागील दीड वर्षांपासून येऊन ठेपलेल्या कोरोना महामारीमुळे याबाबत निर्णय घेण्यावर मर्यादा आल्या होत्या. नंतर पुणे पालिकेनं 2 महिन्याआधी याबाबत प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सुपूर्द केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी नगरविकास मंत्र्यापुढे ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री शिंदे यांची भेट घेऊन सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याची मागणी केली. या सर्व प्रयत्नांना यश आले आहे. याबाबतच्या प्रस्तावावर शिंदे यांची स्वाक्षरी झाली असून, ते येत्या दोन ते तीन दिवसांत सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.