Pune News : शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – माजी महापौर व ज्येष्ठ नेते शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका वैजयंती पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड आणि सलीम शेख यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ गायक व पक्षाचे नेते आनंद शिंदे, प्रदीप गारटकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,  अजित पवार यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि अजितदादांची दूरदृष्टी व विकासकामांप्रति असलेले झपाटलेपण यामुळे निश्चितच राज्याचा आणि पुण्याचा विकास होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पुणे शहराला पुन्हा विकासवाटेवर आणू शकतो, असा विश्वास या वेळी सर्वांनी पक्ष प्रवेश करताना व्यक्त केला.

पवार साहेब व अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. तसेच, पुणे महापालिकेच्या येत्या निवडणुकीत सत्तापरिवर्तनाच्या मोहिमेला बळ मिळणार आहे, असा विश्वास पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.