Pune News : एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा. त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतेय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

याबाबत ॲड. आंबेडकर म्हणाले, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते.

दरम्यान केंद्रात आरएसएस, भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले. या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे.

नको असलेले कायदे या प्रकरणात लावण्यात आले. हे सुरू असतानाच राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले.

त्यात एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पवारांनी या पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावीत. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती जनतेसमोर येईल.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा ॲड. आंबेडकर आंबेडकर यांनी व्यक्त केली असल्याची माहिती ‘वंचित’चे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.