Pune News : पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी शरद पवारांनी अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे, पिंपरी - चिंचवड, जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आता पवारच उतरले मैदानात

एमपीसी न्यूज – जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी शुक्रवारी या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये नेहमीच्याच उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे, पिंपरी – चिंचवड आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत. याबाबत ये उद्या शनिवारी महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तातडीने पुण्यातील जंबो हॉस्पिटलचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नसल्याने नागरिकांचे मृत्यू होत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही याच हॉस्पिटलमध्ये योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला होता.

त्यावरूनही शरद पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. हे जम्बो हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्याचा पुणेकरांना लाभ होतो का, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी पवारांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला सातत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेत असतात. तरीही हे संकट काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे खुद्द शरद पवारच आता मैदानात उतरले आहेत. मागील दोन दिवसांपासून पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

गुरुवारी पिंपरी – चिंचवड परिसरातील आढावा घेतल्या नंतर शुक्रवारी लगेचच त्यांनी पुणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

उद्या (शनिवारीही) पवार याबाबत आढावा घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापलिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी – चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.