Pune News : राज्यसभेत कायदे संमत होताना शरद पवार हजर नव्हते : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत हे कायदे पास झाले. तेव्हा पवार साहेब दिल्लीमध्ये नव्हते. ते राज्यसभेत हजर नव्हते. त्यामुळे जर या कायद्याबाबत चर्चा झाली पाहिजे असे वाटत असेल तर त्यावेळी पवार साहेबांनी राज्यसभेत हजर असणे आवश्यक होते, अशी जहरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोथरूड येथील पंडीत दिनदयाळ उपाध्याय शाळेत विद्यार्थ्यांना मास्क चॉकलेट देऊन स्वागत केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, शरद पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत काल रात्री एक ट्विट केले आहे. यापेक्षा केंद्र सरकारने काय करायला पाहिजे. हे मला पण समजत नाही. आता शरद पवार यांनी समजून सांगा. जर दीड वर्ष कायद्याची अंमलबजावणी थांबणार आहे. त्याकाळात केवळ चर्चाच चर्चा होणार आहे आणि विश्वासात घेतले जाणार आहे. त्यामुळे हा आडमुठेपणा चालला आहे. शिवसेनेने तर लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकताना मतदान का केले नाही. त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या माध्यमातुन विजयी न झाल्यामुळे मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला त्रास देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता न्यायालयाने दीड वर्षासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पवार साहेब शेतकर्‍यांना का म्हणत नाही की, आता आपल बर्‍यापैकी समाधान झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांच्या मुलीच्या साखर पुड्याच्या कार्यक्रमा दरम्यान संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट झाली त्यावर ते म्हणाले की, आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे की, दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या जागी आणि एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. तसेच संजय राऊत यांच्या मुलीच्या साखर पुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्रजीनी जायला पाहिजे होत. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात. प्रेमाने भेटले तसेच दुश्मनी ही राजकारणात कधीच नसते. मैत्री असायलाच पाहिजे. पवार साहेबांवर आम्ही टीका टिप्पणी करतो. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जर काम वाढवायचे असेल तर त्याच्यावर टीका केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही आणि त्यांना मी भेटल्यावर वाकूनच नमस्कार करणारच ही आमची संस्कृती आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.