Pune News : शरद पवार यांची पुणेकरांना भरीव मदत ; तीन दिवसांत मिळणार 6 कार्डियक ॲम्ब्युलन्स

बारामती हॉस्टेल येथे आज दुपारी साडे बारा वाजता श्री पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील लोकप्रतिनिधिंची आढावा बैठक घेतली.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कार्डियक ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने उपचारा अभावी नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पवारांनी तीन दिवसांत तब्बल 6 कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन दिले.

बारामती हॉस्टेल येथे आज दुपारी साडे बारा वाजता श्री पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील लोकप्रतिनिधिंची आढावा बैठक घेतली.

यावेळी राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, माजी महापौर अंकुश काकडे, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सूचनाही केल्या. लोकप्रतिनिधींच्या बैठकीपूर्वी पवारांनी अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली.

कोरोनाचे आणखी 150 इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार होण्यासाठी ते ससून हॉस्पिटल आणि जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

पुणे शहराचा मृत्यूदर 2.40 टक्के आहे. ही समाधानाची बाब आहे. बाकी ठिकाणी हा मृत्यू दर तब्बल साडे तीन टक्के आहे. 40 टक्के रुग्ण सातारा, नगर येथून पुणे शहरात उपचारासाठी येत आहेत.

शहराच्या 52 लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत्या. त्यातील एक बंद आहे. त्याची दखल घेऊन तातडीने 6 कार्डियक ॲम्ब्युलन्स देणार असल्याचे पवारांनी जाहीर केले. तर, माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या निधनाचीही पवारांनी सविस्तर माहिती घेतली.

ताप आल्यावर तातडीने नागरिकांनी तपासणी करायाला हवी, अँटिजेना टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून लगेचच फिरणे बरोबर नाही. प्रत्येक नागरिकाची प्रतिकार शक्ती वेग वेगळी आहे.

लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा 2 – 3 दिवसात टेस्ट केली पाहिजे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मास्क लावावा, मास्क न लावल्याने सुमारे 1 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, याचा अर्थ आणखी जनजागृती करावी लागणार आहे, अशा अनेक महत्वपूर्ण सूचनाही पवारांनी या बैठकीत केल्या.

उद्या शनिवारीही शरद पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राष्ट्रवादीतर्फे लवकरच प्रत्येक मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये बेड कुठे उपलब्ध आहेत, टेस्ट कुठे करायची याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, असे आमदार चेतन तुपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.