Pune News : भगवा झेंडा खांद्यावर घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावला – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – पंढरीच्या पायी वारीला निघालेल्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकार्यांना केलेली अटक हा हिंदुत्वाचा अपमान असून त्यामुळे शिवसेनेने भगवा झेंडा खांद्यावर घेण्याचा अधिकार गमावला असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

मुळीक म्हणाले, ‘भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीची पायी वारी करण्याची मोठी परंपरा आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले होते. सामान्य वारकऱ्यांना पायी वारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी वारकर्यांनी केलेली शांततामय आंदोलने चुकीच्या पद्धतीने गुंडाळून टाकली. याबद्दल जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘सत्तेच्या मोहापोटी शिवसेनेने आधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आता सत्ता टिकविण्यासाठी वारकर्यांच्या विरोधात अन्याय पद्धतीने कारवाई केली जात आहे. वारकर्यांच्या वेष परिधान करू नका असा दम या सरकारचे पोलीस भरतात. त्यांच्याजवळील टाळ, चिपळ्या, पताका हिसकावून घेतात. वारकऱ्यांच्या हातातील हिसकावून घेतलेली भगवी पताका हाती घेण्याचा कोणताच अधिकार आता शिवसेनेला राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली महापूजा विठ्ठल स्वीकारेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.