Pune News : मिळकतकर वाढीला शिवसेना-रिपाइंचा विरोध !

0

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहेत. त्याच प्रामाणिकपणे नियमित मिळकत कर भरणार्‍या नागरिकांवर 11 टक्के करवाढीचा भुर्दंड लादणे चुकीचे आहे. त्यामुळे या करवाढीला शिवसेना आणि रिपाइंने विरोध केला आहे.

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना दरवाढीची शिक्षा, कर बुडव्यांना अभय योजना अशी सत्ताधारी भाजपची भूमिका दिसत आहे. पुणेकरांनी सत्ताधारी भाजपवर प्रामाणिकपणे विश्वास दाखवून एकहाती सत्ता दिली असून या भुमिकेमुळे त्यास तडा गेला आहे.

महापालिकेच्या मिळकतकरामध्ये सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात 130 कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. पालिकेच्या मिळकतकराची वर्षानुवर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांसाठी 75 टक्के सूट देणारी अभय योजना राबवत आहे. गेल्या 3 महिन्यांत 50 लाखापर्यंत थकबाकी असणार्या थकबाकीदारांना जवळपास 175 कोटी रुपयांची सूट देऊन महापालिकेने 370 कोटी रुपये थकीत कर मिळवला आहे. मिळकतींवर कर आकारणी न झालेल्या हजारो मिळकती शोधल्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

दरम्यान रिपाइंचे नगरसेवक, माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे म्हणाले, पालिका प्रशासनाने मिळकतकरात सुचविलेली दरवाढ मान्य करु नये. त्याऐवजी मोबाईल कंपन्या, आयटी, आयटीईएस कंपन्या, दुबार मिळकती यासह एकुण मिळकत कराची थकबाकी ही 5 हजार 550 कोटी रुपये आहे. त्यामुळे ही थकबाकी वसुल करावी ही आमची मागणी आहे. तसेच प्रस्तावित मिळकतकर वाढ रद्द करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.