Pune News : थकीत एफआरपीसाठी शिवसेनेचं साखर संकुलापुढे धरणे आंदोलन !

एमपीसी न्यूज : पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मात्र,  शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत शिवसेनेने सोमवारी साखर संकुलसमोर धरणे आंदोलन केले. 

 

सोलापूर जिल्हा शिवसेनेचे नागेश वनकळसे, अशोक भोसले,हर्षल देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या आंदोलनाची साखर आयुक्त‌ शेखर गायकवाड यांनी तात्काळ दखल घेऊन आंदोलकांच्या‌ शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले.

 

यावेळी शिष्टमंडळाने सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी 70 टक्के  रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसाची एफ.आर.पी. त्वरीत शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत,  कारखान्याला ऊस गेल्यापासून 14 दिवसात ऊसाच्या एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरीत द्यावे, शेतकऱ्यांचे मागील 2 वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरीत मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.

 

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एफआरपीच्या रक्कमेसाठी धरणे आंदोलन करीत मागण्यांचे निवेदन दिले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांनी एफआरपीनुसार पहिली उचल दिली आहे, तशीच सोलापूरच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांनी जास्तीत जास्त रक्कम पहिली उचल म्हणून द्यावी असा आमचा प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.