Pune News : धक्कादायक ! ब्रिटनवरून आलेल्या 109 जणांचा शोध लागेना

महापालिका बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी प्रशासनाचे पोलिस आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज : युरोपासह ब्रिटनमध्ये कोरोना विषाणुने स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवून नवीन भयंकर स्वरुप धारण केल्यामुळे तेथे मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, युरोपातून मायदेशी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एक डिसेंबरपासून आज पर्यंत जवळपास 542 प्रवाशांच्या यादीतील 109 जण बेपत्ता आहेत.

‘आरटीपीसीआर’साठी त्यांचा शोध लागत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्तांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लेखी पत्र पाठविल्यामुळे ही बाब उघडकीस आली.

एकेकाळी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पुणे शहरात कोरोना आटोक्यात आला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजारांच्या आसपास स्थिर आहे. मृत्यूदर घटत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता मावळली आहे.

मात्र, युरोपीय देशांसह ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगभरात पुन्हा रेड ॲलर्ट घोषित केला गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर स्वॅब टेस्टिंग सेंटर उभारले गेले आहे. परंतु एक डिसेंबरपासून परदेशातून येणाऱ्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

या संदर्भात बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, एक डिसेंबरपासून युरोप आणि ब्रिटनहून विमानाने आलेल्या प्रवाशांची यादी महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामधील पत्ता व मोबाईल नंबरनुसार सर्वांचा शोध घेऊन आरटीपीसीआर स्वॅब घेतले जात आहे.

फक्त काही लोकांचे नाव, पत्ते आणि मोबाईल नंबर जुळत नसल्यामुळे त्यांचा शोध लागत नाही. लवकरच त्यांचा शोध घेऊन कोरोना टेस्ट केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

परंतु महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी पुणे पोलिस आयुक्तांना ‘त्या’109 जणांचा शोध घेण्यासंदर्भात विनंती करणारे पत्र पाठविल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.