Pune News : पर्यावरण जनजागृतीसाठी लघुपट हे प्रभावी माध्यम- मेघराज राजेभोसले

एमपीसी न्यूज: पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब असून यावर लवकर उपाय नाही शोधला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यासाठी तरुणांमध्ये पर्यावरणासंदर्भात जागृती करणे गरजेचे असून यादृष्टीने लघुपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले आहे.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पुणे महापालिका, माय अर्थ फाऊंडेशन, सस्टेनेबल इनिशिएटिव्ह, एनव्हारमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि ध्यास प्रतिष्ठानातर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी (दि. 13) रोजी ते बोलत होते.

यावेळेस दिग्दर्शक नितिन सुपेकर, लिज्जत पापड उद्योग समूहाचे संचालक सुरेश कोते, पुणे मनपा पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ईसीआयचे सदस्य दत्तात्रय देवळे, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे विरेंद्र चित्राव, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, वनराईचे सचिव अमित वाडेकर, संयोजक अनंत घरत, अमोल उंबराजे, ललित राठी, सोमनाथ पाटील आदी यांवेळी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, यांसाठी तयार केलेला ‘संकल्प’ हा लघुपट आणि पी. के भांडवलकर यांचा ‘मांजा’ हा लघुपट सर्वोत्कृष्ठ ठरले. कार्यक्रमांत ‘ॲडिक्शन’- अक्षय वासकर (सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक), ‘अवनी’- सुनील डांगे (सर्वोत्कृष्ठ माहितीपट), ‘प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट’ (सर्वोत्कृष्ठ लघुपट संकल्पना), ‘सुरक्षित भविष्य’- हितेंद्र सोमानी (सर्वोत्कृष्ठ ॲनिमेशनपट) ‘जीवाश्म’- जितेंद्र घाडगे (सर्वोत्कृष्ठ संवादलेखक), ‘हिरवी आशा’- सचिन मंगज (छायाचित्रीकरणासाठी) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके ‘गिफ्ट’, ‘अदृश्य’ आणि ‘कचरा विलगीकरण’ या लघुपटांना मिळाली. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव यांनी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पूर्वी घरातला कचरा घरातच जिरवून त्याचे खत तयार होत असे. आज जागा कमी झाली व माणसांची संख्या वाढल्याने पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असल्याचे, आणि कचऱ्याची समस्या गंभीर होत असून कच-याचे योग्य नियोजन झाले नाही तर पुणे शहराच्या काही भागांत ज्याप्रमाणे कच-याचे प्रश्न बिकट झाले आहेत, तसे संपूर्ण देशात चित्र निर्माण होईल, असे अनुक्रमे दत्तात्रय देवळे व सुरेश कोते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.