Pune News: श्रावणामुळे फळांना वाढती मागणी कायम; पावसाचा झेंडू, शेवंतीला फटका

मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांतर्फे देण्यात आली.

एमपीसी न्यूज – श्रावण महिना सुरू असल्याने फळांना वाढती मागणी कायम आहे. आवक घटल्याने लिंबाच्या भावात गोणीमागे 50 रुपयांनी वाढ झाली. तर, आवक वाढूनही मागणीमुळे डाळिंबाच्या भावात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने मोसंबी, संत्री, चिक्कुच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांतर्फे देण्यात आली.

रविवारी मार्केटयार्ड फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 3 ते 5 टन, डाळिंब 100 ते 150 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे 1000 ते 1500 गोणी, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, सीताफळ 15 ते 16 टन, खरबुजाचे 4 ते 5 टेम्पो, सफरचंद दीड ते दोन हजार पेटी, प्लम 500 बॉक्‍स इतकी आवक झाली आहे.

फळांचे भाव- लिंबे (प्रतिगोणी) : 100-150, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-220, (4 डझन) : 30-100, संत्रा : (3 डझन) : 150-350, (4 डझन) : 20-150, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-90, गणेश : 10-30, आरक्ता 10-50. कलिंगड : 5-10, खरबूज : 10-25, पपई : 5-20, चिक्कू : 70-250, सीताफळ : 5-80, सफरचंद- (25 ते 30 किलो) 2500-4000, पियर (25 किलो)- 500-2000, प्लम (5 ते 6 किलो) 500-850.

पावसाचा झेंडू, शेवंतीला फटका
श्रावणाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची चांगली आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बाजारात जवळपास 95 टक्क्यांहून अधिक माल ओल्या स्वरुपात येत आहे. पावसामुळे मालाची प्रत घसरल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. पावसाचा फटका झेंडू, शेवंतीच्या फुलांना बसला.

फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : 30-80, गुलछडी : 40-60, कापरी : 20-60, शेवंती : 20-70, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-20, गुलछडी काडी : 10-30, डच गुलाब (20 नग) : 30-60, लिलि बंडल : 6-10, जर्बेरा : 15-30, जुई : 400-600.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.