Pune News : सात देशांचा सहभाग असलेला ‘मानवता सहाय्य आणि आपत्ती निवारण’ सराव पुण्यात

बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी 20 ते 22 डिसेंबर रोजी पुण्यात पॅनेक्स-21

एमपीसी न्यूज – बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव (पॅनेक्स-21) आयोजित करण्यात आला आहे. सात देशांचा सहभाग असलेला हा सराव 20 आणि 22 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडेल. या सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड येथील विषय तज्ञ आणि प्रतिनिधींचा सहभाग असेल.

या सराव कार्यक्रमाचा प्रसिद्धी सोहळा आज (मंगळवार, दि.7) नवी दिल्लीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कोठारी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते सरावाच्या स्मरणार्थ पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बिमस्टेक सरचिटणीस तेन्झिन लेकफेल, चीफ ऑफ डिफेन्स स्टॅफ जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, चीफ ऑफ इंटग्रेटेड स्टाफ (सीआयएससी) एअर मार्शल बी. आर. कृष्णा आणि बिमस्टेक राष्ट्रांचे उच्चायुक्त आणि राजदूत यांच्यासह नागरी आणि संरक्षण दलातले अनेक प्रतिष्ठित अतिथी उपस्थित होते.

लष्करप्रमुख नरवणे यांनी भविष्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने, परस्पर आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी यंत्रणा विकसित करण्यासाठी या संधीचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आपल्या भाषणात, शेजारी प्रथम या धोरणाचा भाग म्हणून, बिमस्टेकला भारताने दिलेल्या महत्त्वाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. आपत्तींच्या संयुक्त प्रतिसादासाठी संसाधने एकत्रित करण्याच्या दृष्टीने, क्षमता विकास आणि प्रशिक्षण तसेच संस्थात्मक संस्थांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन तज्ञांचा प्रादेशिक पूल, यंत्रणा, नियम आणि कायदेशीर आराखडा असलेली सर्वसमावेशक बिमस्टेक संरचना विकसित करणे आवाहन त्यांनी सदस्य राष्ट्रांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.