Pune News : फलटण-पुणे दरम्यान शटल रेल्वे सेवा सुरु ; प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी न्यूज – फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट रेल्वे सेवेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या उद्घाटनाला खासदार गिरीश बापट, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राज्‍यातील इतर मान्यवर नेते आणि रेल्‍वे मंत्रालयातील वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

फलटण आणि पुण्याला लोणंदमार्गे जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा विद्यार्थी,  शेतकरी, कर्मचारी आणि व्यापारी यांना लाभ होईल. ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस चालेल.

केंद्रीय अर्थसंकल्पामधील महाराष्ट्रासाठी रेल्वेचे बजेट 2009-14 च्या 1171 कोटीच्या तुलनेत आता सरासरी 7107 कोटी झाले आहे. फलटण हे ऊस उत्पादन, भाज्या आणि साखर आधारित उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ते डाळिंब, भेंडी आणि सिमला मिरचीच्या उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

उद्घाटन प्रसंगी प्रकाश जावडेकर म्हणाले, माझ्या विद्यार्थिदशेपासून प्रलंबित असलेली फलटण आणि पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवेची मागणी पूर्ण झाली याचा मला आनंद होत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये रेल्वेचे डबे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग यांच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे. बायो टॉयलेटवर भर दिल्यामुळे रेल्वेबरोबरच रेल्वे मार्ग देखील स्वच्छ झाले आहेत.

जावडेकर पुढे म्हणाले, IRCTC द्वारे रेल्वे तिकिटाचे बुकिंग आणि रद्द झालेल्या तिकिटाचा परतावा मिळवणे आता सोपे झाले आहे. तसेच मानव रहित रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे थांबलेल्या आहेत, कारण मानव रहित रेल्वे क्रॉसिंग ऐवजी आपण आता पर्यायी व्यवस्था देणे सुरू केले आहे.

जावडेकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली होती आणि आता शंभरावी किसान रेल्वे देखील महाराष्ट्रातूनच सुरु करण्यात आली आहे. तसेच रेल्वेने 5000 रेल्वे स्टेशनवर वाय फायची सुविधा दिली आहे. 68 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. बंदरांना रेल्वेमार्गाशी जोडणे तसेच रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे या गोष्टीसुद्धा वेगाने सुरू आहेत. पॅसेंजर रेल्वेच्या गतीने होत असलेला भारतीय रेल्वेचा विकास आता राजधानी रेल्वेच्या वेगाने होत आहे.

* ‘असे’ आहे वेळापत्रक

31 मार्चपासून नियमितपणे सुरू होणारी सेवा खालीलप्रमाणे असेल

01435 DEMU पुण्याहून सकाळी 5.50 ला निघून लोणंदला 7.50 ला पोहोचेल. 8.00 वाजता लोणंदहून निघून सकाळी 9.35 वाजता फलटणला पोहोचेल.

01434 सकाळी 11.00 वाजता फलटणहून निघेल आणि दुपारी 12.20 ला लोणंदला पोहोचेल.

01433 दुपारी 3.00 वाजता लोणंदहून निघेल आणि 4.20 वाजता फलटणला पोहोचेल

01436 संध्याकाळी 6.00 वाजता फलटणहून निघेल आणि संध्याकाळी 7.10 वाजता लोणंदला पोहोचेल. 7.20 ला लोणंदहून निघून पुण्यात रात्री 9.35 ला पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.