Pune News : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी 21 जानेवारीला लक्षवेधी आंदोलन !

एमपीसी न्यूज : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न, अण्णाभाऊ साठे स्मारक, महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली 21 जानेवारीला पुण्यात आंदोलन होणार आहे.

पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा.सकटे पुढे म्हणाले, अलिकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणाच्या विषयावर सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. महाराष्ट्राचे आघाडी सरकारही मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावर विशेष भूमिका घेताना दिसत आहे. पण महाराष्ट्र सरकार मातंग समाजाच्या कोणत्याही प्रश्नावर गंभीर नाही.

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे. त्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ,ब,क,ड करण्यात यावे. बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) स्थापन करण्यात यावी. मागासवर्गीय महामंडळाकडील दलितांची सर्व कर्जे माफ करण्यात यावी.

अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरीत सुरू करून त्यासाठी रूपये एक हजार कोटी भागभांडवल देण्यात यावे. दलित महिलांवरील अत्याचार त्वरीत थांबविण्यासाठी शासकीय स्तरावर ठोस कृती कार्यक्रम आखण्यात यावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, उपाध्यक्ष लक्ष्मी पवार , शहराध्यक्ष जयंत जाधव, विकास भोंडवे, खंडू पवार उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.