Pune News : बारा दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

एमपीसी न्यूज – सनई चौघड्याचा नाद, बँडच्या तालावर (Pune News) वाजत-गाजत निघालेली वरात, रथामध्ये दिमाखात बसलेले नवरदेव, लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता अन जोडीदाराशी नजरानजर करताना ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद अशा थाटामाटाच्या वातावरणात अकरा दिव्यांग जोडप्यांनी रेशीमगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी यांच्या पुढाकारातून दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात वानवडी येथील संस्थेच्या आवारात पार पडला.

दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, उद्योजक पुनीत बालन, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर, संघचालक रवींद्र वंजारवाडकर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, प्रांत सचिव महेश टांकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, सक्षम पुणे महानगर सचिव दत्तात्रय लखे आदी उपस्थित होते.

दारातील तुळशी वृंदावनापासून ते देवघर, स्वयंपाक घरातील सर्व भांडी, बाथरूममधील (Pune News) साहित्य, सोफा-बेड अशा बारीकसारीक प्रत्येक गरजेच्या वस्तू रुखवतात मांडण्यात आल्या होत्या. 12 जोडप्यांचे यावेळी संपूर्ण थाटामाटात लग्न करून देण्यात आले. पुनीत बालन यांनी सर्व नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या व संयोजकांचे आभार मानले.

Railway News : मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय; अनेक रेल्वेगाड्या तासंतास रेल्वे स्थानकात अडकल्या

सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक दत्तात्रय लखे म्हणाले, “दिव्यांगांचा परिचय मेळावा घेत त्यांचे समुपदेशन झाले. उपवरांच्या घरी भेटी देऊन विवाह निश्चित केले. आज प्रत्यक्ष सामान्य जोडप्याप्रमाणे थाटात यांचा संपूर्ण कन्यादान सह विवाह संपन्न झाला. सर्व संसारोपयोगी साहित्य दिले आहे. यासाठी मुख्याध्यापिका शिवानी सुतार, धनश्री बेके, अशोक जव्हेरी, नाना जगदाळे, शिवाजी भेगडे, विजय पगडे, भाऊसाहेब आवटे, किशोर रासकर, रवींद्र बारवकर, सुनिल पाटील या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.