Pune News: पिढ्यापिढ्यांची विषमता दूर करण्यास भगिनीभाव व बंधुभाव गरजेचा – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – पिढ्यापिढ्यांची विषमता दूर करण्यास भगिनीभाव व बंधुभाव गरजेचा असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

स्त्री आधार केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) या संस्थांतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी साहित्य मंजिरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम शनिवारी दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे सादर केला गेला.

_MPC_DIR_MPU_II

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे स्पष्ट केलं.

तसंच त्या म्हणाल्या, “ महिलांचं होणारं शोषण, दमन याविरुद्ध मी एक सुशिक्षित स्री म्हणून काहीतरी केलं पाहिजे हे मला जाणवलं आणि 1984 सालापासून या विषयासाठी मी काम करत राहिले. भागिनीभाव हा जागतिक पातळीवर महत्त्वाचा आहे हे मला जाणवलं. याच जाणीवेतून एक मुद्दा पुढे आला तो म्हणजे महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण, एकमेकांच्या मदतीबरोबरच तिचा मतदानाचा जो अधिकार आहे तो गाजवण्यासाठी किंवा तिला समाजात मिळणारं जे दुय्यम स्थान आहे त्याविरोधात सामुहिक चळवळ करणं गरजेचं आहे असं मला वाटते. म्हणूनच स्त्रियांमधील भगिनीभाव, संवेदनशीलता आणि बदलती नाती याविषयी चर्चा करणारा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे म्हणाल्या, “समाजात लोकांचं असं म्हणणं असतं कि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं कधी फार कौतुक करत नाही. पण मी आज हे सांगू इच्छिते कि स्त्रिया स्त्रियांचं कौतुक नक्कीच करतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा साहित्य मंजिरी कार्यक्रम आहे. कारण आज इतक्या मोठ्या व्यासपीठावरून समाजातील दिग्गज महिला, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या महिला एकत्र येणार आहेत. भगिनीभाव जोपासणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होणार आहे.” कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.