Pune News : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणने माध्यमांची दिशाभूल करणे थांबवावी – आंबिल ओढा नागरी कृती समिती

विकसकाच्या फायद्यासाठी एसआरएचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर बैठकीतील मुद्दे माध्यमांना चुकीचे सांगत असल्याचा कृती समितीचा आरोप

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेतील बाधित आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेले निर्णय आणि अधिकाऱ्यांमार्फत प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीवर आंबिल ओढा नागरी कृती समितीच्या वतीने हरकत नोंदविण्यात आली आहे.

प्रशासनामार्फत माध्यमांना सांगण्यात आले होते की, “केदार असोसिएट्समार्फत पुनर्वसन करावे” तसेच “आंबिल ओढ्यातील त्या झोपड्यांचा प्रश्न मार्गी” मात्र यास आंबिल ओढा नागरि कृती समितीच्या वतीने हरकत नोंदविण्यात आली आहे. विकसक आणि प्रशासन माध्यमांची दिशाभूल करत असून स्थानिक नागरिकांनी या सर्व गोष्टींवर नाराजी व्यक्त केली आहे. सदर विकसक हा काळ्या यादीतील असून यापुर्वीच्या त्यांच्या एसआरए स्किम आजतागायत पुर्ण झालेल्या नसल्याने नागरिकांचा बिल्डरवर विश्वास नसून प्राधिकरणाशी संवाद, पत्रव्यवहार करणार आहे असे कृती समितीचे म्हणणे आहे.

तसेच स्थानिकांचे तात्पुरते स्थलांतर राजेंद्रनगर मध्ये करणार असल्याचे बातमीमध्ये नमूद केले प्रत्यक्षात पाहणी दौऱ्यांमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रशासन व स्थानिक नागरिक कृति समिती झालेल्या चर्चेनुसार रहिवाश्यांना R7 योजनेतील घरे पाहण्याचे सुचित केले व त्यानंतर पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात येईल. फायनल प्लॉट क्र.28 व प्लॉट 2 अ हा वेगळा असूनही झो.पु.प्रा च्या 21 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या पात्र अपात्र यादीत दोन्ही प्लॉटवरील झोपडपट्टी धारकांची एकत्रित यादी प्रसिद्ध केली आहे. ही प्राधिकरणाकडून दिशाभूल असून आम्ही वेळोवेळी त्याबद्दल बैठकीत कळविले आहे. आंबिल ओढा न वळल्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आम्हाला याच जागी योजनेत घरे देणार का? असा सवाल यावेळी आंबिल ओढा नागरि कृती समितीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.