Pune News : भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंंकिंग घसरले : वंदना चव्हाण

केंद्रात आणि महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पात पुणे आता २८ व्या क्रमांकावर गेले असल्याचे वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात आणि महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमधून उघड झाले आहे. प्रशासनासह सत्ताधारी भाजपचे हे सपशेल अपयश आहे, अशा शब्दांत राज्यसभेच्या खासदार ॲ ड. वंदना चव्हाण यांनी हल्लाबोल केला.

पुणे शहर हे मुळातच स्मार्ट शहर आहे. गेल्या 15-20 वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेसा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये देशात पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली.

त्यावेळी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शहरातील 14 प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उत्तम कामामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्‍लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रिट, ई- बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरुवात झाली.

मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले. गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही.

स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही.

परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदा आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या घसरलेल्या रँकिंगच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही महापालिकेला सहकार्य करीत आहे. तरीही शहरासाठी नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला गेल्या दीड वर्षांत करता आलेली नाही.

भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांचेही स्मार्ट सिटीकडे लक्ष नाही. तसेच पुण्यातून आमदार झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचेही स्मार्ट सिटी आणि महापालिकेतील कारभाराकडे दुर्लक्ष झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पुण्याचे रॅंकिंग घसरले आहे. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्‍वासघात न करता त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.