Pune News : … म्हणून पोलिसांनी केला शाहिर मावळे यांचा सत्कार

एमपीसीन्यूज :  पुण्यातील लाल महालासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारा पोवाडा कार्यक्रम करणाऱ्या शाहीर हेमंत  मावळे यांना पोलिसांनी covid-19 चे कारण देत परवानगी नाकारली. परंतु, तरीही मावळे यांनी पोवाड्याचा कार्यक्रम घेतलाच. लाल महालासमोरची गर्दी हटत नसल्यामुळे फरासखाना पोलिसांनी शाहीर मावळे यांना स्वतःच्या गाडीतून पोलिस ठाण्यात नेले.  तेथे  मावळे यांचा सत्कार करून त्यांना पुन्हा घरी पाठवले.

राज्य सरकारने यंदा शिवजयंतीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली होती. परंतु, तरीही शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा पोवाडा कार्यक्रम सादर करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शाहीर हेमंत मावळे यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली होती. परंतु, शाहीरांच्या या पत्राला राज्य सरकारने उत्तर दिले नाही.

त्याचा निषेध करण्यासाठी शाहीर मावळे यांनी लाल महालासमोर आज पोवाडा गायचे ठरवले होते. ठरल्यानुसार आज त्यांनी लालमहालासमोर काही साथीदारांसह पोवाडा सादरही केला. हा पोवाडा ऐकण्यासाठी शिवभक्तांची गर्दी ही त्याठिकाणी जमली होती.

परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कुठेही कार्यक्रम किंवा शोभायात्रेला यात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी शाहीर मावळे यांना कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. परंतु, गर्दी वाढतच गेल्याने पोलिसांना शाहीर मावळे यांना स्वतःच्या गाडीत बसवून फरासखाना पोलिस ठाण्यात आणावे लागले. त्यानंतर लाल महाला समोरील गर्दी हळूहळू कमी झाली. दरम्यान, पोलिसांनीही शाहीर मावळे यांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत सुटका केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.