_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : कचर्‍याच्या अचूक नोंदीसाठी केलेल्या विशेष ‘प्रोग्राम’मुळे कचर्‍याचे ऑडीट करणे सोपे – घनकचरा विभाग

एमपीसी न्यूज – शहरातून उचलल्या जाणार्‍या कचर्‍याच्या अचूक नोंदी ठेवण्यासाठी महापालिका शहरातील सर्व रॅम्प आणि कचरा प्रकल्पांमध्ये संगणकीकरण केले असून ऑनलाईन नोंदींसाठी विशेष ‘प्रोग्राम’ही तयार केले आहे. यामुळे शहरातील कचर्‍याचे ऑडीट करणे सोपे आणि अधिक पारदर्शक होईल, असा दावा महापालिकेच्या घनकचरा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.

शहरात दररोज दोन हजार टन ओला व सुका कचरा गोळा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या प्रमाण मानून आणि विविध रॅम्प आणि प्रकल्पांतील नोंदीवरून आतापर्यंत शहरातील कचर्‍याचे प्रमाण निश्‍चित करण्यात येत होते. विशेष असे की याच नोंदीचा वापर अगदी न्यायालयात देण्यात येणार्‍या प्रतिज्ञापत्रापासून, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा, पर्यावरण अहवाल आणि अगदी अंदाजपत्रक तयार करताना करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, यानंतरही कचर्‍याची वाहतूक करणार्‍या वाहनांची धाव, कंत्राटी कामगारांची नेमणूक, प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी यामधील त्रुटी वेळोवेळी समोर आल्या आहे. कचरा निर्मुलनाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची टिका गेली अनेक वर्षे होत आहे. घन कचरा विभागाकडील हस्तलिखित नोंदी, घनकचरा व्यवस्थापनावर होणारा खर्च आदी बाबींमध्ये नेहमीच संदेहास्पद प्रकरणे वेळोवेळी समोर आल्यानंतरही या विरोधात ठोस स्पष्टीकरण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरात संकलित होणार्‍या कचर्‍याच्या नोंदीपासून अगदी प्रक्रिया प्रकल्प, शेतकर्‍यांना देण्यात येणारा ओला कचरा, रिजेक्टच्या नोंदींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरणाचे सकारात्मक पाउल उचलले आहे. शहरातील विविध भागातील रॅम्पवर घराघरातून आणि व्यावसायीक आस्थापनांमधून गोळा केलेला कचरा एकत्रित केला जातो. तेथे ओला-सुका कचर्‍यासोबतच, पुनर्वापर करण्यासारखा आणि रिजेक्टचे विलगीकरण करून तो शहराच्या विविध भागातील १० प्रक्रिया प्रकल्पांवर वाहून नेला जातो.

कचर्‍याचे स्वतंत्र मोजमाप करण्यासाठी आणि त्याच्या नोंदी करण्यासाठी सर्व रॅम्प आणि प्रक्रिया प्रकल्प संगणकांनी ऑनलाईन जोडण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले असुन त्यावर तातडीने नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अ‍ॅपमुळे अपडेट होणार्‍या नोंदी अधिकार्‍यांना अगदी मोबाईलवरही पाहाता येत आहेत. यामुळे प्रत्येक दिवशी गोळा होणारा तसेच विल्हेवाट लावण्यात येणार्‍या कचर्‍याची अद्ययावत माहिती मिळणे शक्य होणार असून अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. आगामी काळात या नोंदींचा वापर करून कचरा व्यवस्थापन अधिकाअधिक गतीमान करण्यासाठी होईल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपआयुक्त अजित देशमुख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.