Pune News : ‘ट्राईब छत्री’ कलादालनातील आदिवासी, ग्रामीण कलाकार निर्मित कलावस्तू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतातील विविध भागांतील गणपती प्रतिमा आणि त्याच्याशी निगडित कलाकुसरीच्या वस्तू, भेट वस्तू , सजावटीसाठीच्या वस्तू हे सर्व एका ठिकाणी पाहता येणार आहेत.

एमपीसी न्यूज – भारतातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकार निर्मित गणेश प्रतिमा, कलावस्तूचे प्रदर्शन ‘ट्राईब छत्री’ कलादालनात सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्टपासून हे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.

पर्वती पायथा, महिला मंडळ येथे असलेल्या ‘ट्राईब छत्री’ कलादालनाच्या संचालिका पूर्वा परांजपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘ट्राइब छत्री ‘ हे केंद्र शासन मान्यताप्राप्त आदिवासी कलावस्तू दालन आहे .

भारतातील विविध भागांतील गणपती प्रतिमा आणि त्याच्याशी निगडित कलाकुसरीच्या वस्तू, भेट वस्तू , सजावटीसाठीच्या वस्तू हे सर्व एका ठिकाणी पाहता येणार आहेत.

 

राजस्थानातील टेराकोटाच्या गणेशमूर्ती, ओडिशातील आदिवासींनी पाम वृक्षापासून केलेलया गणेश प्रतिमा, रंगविलेले बुक मार्क, राजस्थानातील आदिवासींनी केलेले धातूंच्या पांढऱ्या गणेशमूर्ती, पट्ट चित्र प्रकारातील गणेश प्रतिमांचे पेंटिंग, पश्चिम बंगालच्या कलाकारांनी कागद आणि ज्यूट(ताग ) पासून केलेल्या गणेश प्रतिमांच्या कलावस्तू हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे.

ओडिशतील आदिवासींनी तांदळाच्या साळीपासून बनवलेल्या पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

‘ट्राईब छत्री’ कलादालनात 25 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. सकाळी 11 ते 2 तसेच, सायंकाळी 4 ते रात्री 8 अशी या प्रदर्शनाची वेळ आहे.

प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून कलावस्तू विकत घ्यायच्या असल्यास त्या थेट कलाकारांकडून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.