Pune News : क्रीडा संकुले, खासगी क्लासेस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सोमवारपासून सुरू होणार

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील मैदाने तसेच क्रीडा संकुले आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. हे आदेश सोमवारपासून (5 जुलै) लागू करण्यात येणार आहेत. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनाची साथ अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली नसल्याने पुणे शहरात अद्यापही अनेक सुविधा पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही सुविधांसाठी ठराविक वेळ निश्चित करून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या साप्ताहीक कोरोना आढावा बैठकीनंतर पालिकेकडून आणखी काही घटकांसाठी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

शहरातील मैदाने आणि इनडोअर क्रीडा संकूलं सोमवारपासून आठवडयाचे सातही दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरू असणार आहेत. या शिवाय शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेसही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

या शिथील केलेल्या निर्बंधानुसार, मैदाने व इन डोअर क्रीडा संकुलांचा वापर करण्यासाठी कोरोना प्रतिबंधीत लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणार्थींनी लसीचा एक डोस घेतला असणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.