Pune News : रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्य़ूज – रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, रात्रपाळीची सिलिंग मर्यादा रुपये 43,600 चा आदेश रद्द करावा, एक जुलै 2017 चा रिकव्हरी आदेश परत घ्यावा तसेच रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करू नये, अशा विविध मागण्यांसह पुण्यातील रेल्वे स्टेशन मास्तरांनी आज (बुधवारी) विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या विविध मागण्यांसाठी देशातील स्टेशन मास्तरांनी 7 ऑक्टोबरपासून विरोध सुरु केला आहे. त्यासाठी चार टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, रेल्वे बोर्डाने अद्याप याची दखल घेतली नाही. परिणामी, ‘आएस्मा’ आक्रमक झाली असून, आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आजची धरणे आंदोलने आहेत.

मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्राते म्हणाले, रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार 29 सप्टेंबर 2020 पासून जे स्टेशन मास्तर अधिकारी व कर्मचारी रात्रपाळी करतील त्यांच्या भत्त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने बेसिक सिलिंग मर्यादा रद्द करावी आणि पैशांचा परताव्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. त्याचप्रमाणे आदेश लागू करण्याची तारीखही चालू महिन्यापासून घेण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे चंद्राते म्हणाले.

यावेळी विश्वजित कीर्तिकर, अमित कुमार, शकील इनामदार, अजय सिन्हा, अनिल तिवारी, दिनेश कांबळे, नरेंद्र ढवळे, प्रल्हाद कुमार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.