Pune News : वीज खरेदीसाठी पालिका एसपीव्ही स्थापन करण्यास स्थायी समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज –  महापालिकेचा वीज खरेदीवर होणारा  खर्च कमी करणे आणि महावितरणवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महापालिकेने ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने महाप्रीत या शासकीय संस्थेबरोबर करार केला असून ओपन ॲक्सेसव्दारे वीज खरेदी करण्यासाठी महाप्रीत सोबत एसपीव्ही स्थापित करण्यात येणार आहे. या एसपीव्हीमधील सदस्य नियुक्तीचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे  असणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे वर्षाकाठी 28 कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत अपेक्षित आहे. 

 

महापालिकेला दरवर्षी वीज बिलांपोटी सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च करावे लागतात. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी 293 कोटी रुपये वीज बिलापोटी तरतूद केली आहे. महापालिकेची दर महिन्याला 23 मेगावॅट इतकी विजेची मागणी असून, एक कोटी 28 लाख 55 हजार 450 इतकी युनिट खर्च होतात. विजेपोटी येणाऱ्या खर्चात बचत करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी खरेदीच्या दराबाबतही विचार झाला पाहिजे, असा विचार करत महापालिकेने वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

महापालिकेला प्रचंड प्रमाणात वीज लागत असल्याने वीज उत्पादक कंपन्यांकडून सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होऊ शकते, हा हेतू त्यामागे होता.  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार, ज्या ग्राहकांची वीजेची गरज ही एक मेगावॉटपेक्षा अधिक आहे, ते ग्राहक खुल्या बाजारातून वीज खरेदी करू शकतात. या निर्देशांचा आधार घेत महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला आहे .

 

या वीज खरेदीसाठी सल्लागार म्हणून महाप्रीतची नेमणूक करण्यात अली आहे. त्यानुसार महापालिका व महाप्रीत एकत्र येत विशेष उद्देश कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल) स्थापन करणार आहे. या कंपनीत महापालिका 26 टक्के गुंतवणूक करेल, तर उर्वरित भागभांडवल कंपनी स्वत: टाकेल किंवा कर्जरूपाने उभे करेल. प्रकल्प उभा राहिल्यानंतर त्यातून वीजनिर्मिती सुरू होईल. असे प्रस्तावित नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.