Pune News: स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करा- दीपाली धुमाळ

पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या अ‍ॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असून या सर्वांचे समन्वय होत नसल्याने अशा घटना घडत आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा (कक्ष) तातडीने सुरू करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी गुरुवारी आयुक्तांकडे केली आहे.

पुण्यात टीव्ही 9 या वृत्तवाहिनीसाठी काम करणा-या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. जम्बो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुस-या खासगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.

मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जम्बो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्सची गरज होती. अशी अ‍ॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते. पहाटे चारला अ‍ॅम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयू मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. ही अत्यंत दुदैवी घटना असून पुणे महानगरपालिकेस लाजिरवाणी बाब आहे.

पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या अ‍ॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असून या सर्वांचे समन्वय होत नसल्याने अशा घटना घडत आहेत.

अशा प्रकारे पत्रकारावर वेळ येते तर सामान्य नागरिक कोणत्या संकटातून जात असेल याची कल्पना ही करणे अशक्य आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर योग्य व वेळेवर आवश्यक उपचार व सोयीसुविधा मिळणे महत्वाचे आहे.

यासाठी पुणे महानगरपालिकेचे स्वतंत्र यंत्रणा (कक्ष) उभारणे गरजेचे आहे. रुग्णास अन्य रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास लवकरात लवकर सर्व सुविधांयुक्त अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे व ते या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रित करावे, अशी विनंतीही दीपाली धुमाळ यांनी पत्रातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.