Pune news: अकरावीची प्रवेश प्रक्रिया तातडीने चालू करा – भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – शिक्षण विभागाने सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिताची अकरावीची प्रवेश प्रक्रिया अचानक थांबविल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. मानसिकरित्या त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया तत्काळ चालू करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना पत्र पाठविले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे दहावीचे निकाल उशीरा लागले आहेत. त्यांनतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया अगोदरच विलंबाने चालू झाली होती. आता अचानक ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असून मानसिकरित्या त्यांचे खच्चीकरण होत आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची दिलेली स्थगिती न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असली तरी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, लक्ष घालावे, प्रवेश प्रक्रिया तत्काळ चालू करावी  जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती गोरखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.