Pune News : राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करीत आहे. त्यामुळेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससून रूग्णालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार कोणतेही काम करीत नाही. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

कोरोनाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘1 मे पासून शहरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. नागरिकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत.’

खासदार बापट म्हणाले,‘शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने 184 लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच लस केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना लसीच्या साठ्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज मिळावा यासाठी योजना करणे आवश्यक आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केेली पाहिजे. असे सडेतोड प्रत्युतर मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.