Pune News : तळजाई टेकडी वाचविण्यासाठी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – तळजाई टेकडीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्प राबविला गेला तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार, अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी या प्रकल्पास विरोध दर्शवित आहेत. तळजाई टेकडीचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पर्यावरणप्रेमींतर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, श्रीकांत मेमाणे, इन्वायरमेंट क्लब ऑफ इंडीयाचे ललित राठी, विजय जोरी आणि विजय चोरगे उपस्थित होते.

राज्याचे वनराज्यमंत्री म्हणून हे प्रकल्प रद्द करावेत तसेच येथील निसर्ग संवर्धनाकरिता वेगवेगळे उपक्रम राबवावेत, पुण्यातील ऑक्सिजन म्हणजेच तळजाई टेकडी वाचवावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे पर्यावरणप्रेमी संस्था माय अर्थ फांउडेशनच्या वतीने वनराज्यमंत्री भरणे यांना केली आहे.

पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीवर 110 एकर जागेत विकासाच्या नावावर तब्बल 120 कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तळजाई टेकडी नष्ट झाली, तर कालांतराने शहराचा श्वास गुदमरेल. सामान्य जनता, पर्यावरणप्रेमी आणि तिथेच फिरायला येणाऱ्या नागरिकांचाही या कृत्रिम प्रकल्पाला विरोध आहे. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी रहावी, असे पर्यावरणप्रेमींनी वाटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.