Pune News : कांदा बियाणांची डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड मार्फत होणारी निर्यात तत्काळ थांबवा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे.

एमपीसीन्यूज – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा बियाणे मुबलक व वाजवी दरात मिळावे यासाठी डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) मार्फत होणारी निर्यात तत्काळ थांबविण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा बियाणांचे दर दुपटीने वाढले असून मागील वर्षी 1500 रुपये असणारा दर यंदा 3000-3500 इतका झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यातच कांद्याला अतिशय कमी भाव मिळाला, शिवाय साठवणूक केलेला कांदा सडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

या पार्श्वभूमीवर कांदा बियाणांचा तुटवडा व वाढता दर लक्षात घेता डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) मार्फत 20 देशांना होणारी कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली होती. तसेच खासदार डॉ. कोल्हे यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

डॉ. कोल्हे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेच्या या मागणीची दखल घेऊन तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

त्याचबरोबरीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र पाठवून कांदा बियाणांची डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) मार्फत 20 देशांना होणारी कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबविण्याची मागणी केली.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांना वाजवी दरात व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी केंद्रीय कृषि मंत्रालयाने हस्तक्षेप करून निर्यात थांबविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या संसद अधिवेशनात आवाज उठविणार असून केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.