Pune News : वृक्षांची सिमेंट काँक्रिटिंगमुळे होणारी गळचेपी थांबवा – अनंत घरत
वृक्ष संवर्धन कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
एमपीसी न्यूज – शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वत्र फुटपाथ नवीन बांधणीची कामे चालू आहेत. मात्र, अधिकराऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच ठेकेदार आणि मजुरांच्या अज्ञानामुळे झाडांचा नाहक बळी जात आहे. वृक्ष संवर्धन कायद्याप्रमाणे झाडांना एक मीटर व्यासाचे आळे करणे बंधनकारक असूनही ठेकेदारांकडून सर्रास पणे वृक्षांना काँक्रिटिंग मध्ये बंदिस्त केले जात आहे. त्यामुळे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माय अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी केली आहे.
माय अर्थ फाऊंडेशन तर्फे पुणे मनपा आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. अनंत घरत म्हणाले की, पुणे शहरात काही मागील काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटिंगच्यामुळे टिळक रोड, ग्राहक पेठ समोर पिंपळाचे वृक्ष कोसळून पीएमपीएमएल बसचे नुकसान आणि एकाचा मृत्यू झाला होता. असे उदाहरण समोर असून पण आपल्या माध्यमातून फूटपाथ काम करीत असताना झाडांना सुरक्षेकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
पर्यावरणाची होत असलेली हानी पाहता विकासाच्या नावावर भकासिकरण केले जात आहे असे निदर्शनास येत आहे. पुणेकर नागरिक पर्यावरण विषयावर जागृत असून आपण सदर विषयावर लक्ष घालून शहरातील सर्व फुटपाथ वरील झाडांचा सिमेंट काँक्रिटिंग पासून बचाव करावा आणि त्या भोवती छोटेसे आळे करावे जेणेकरून पाण्याचा निचरा सुद्धा जमिनीत होईल. असे मत घरत यांनी मांडले आहे.