Pune News : कोरोना लसीचे राजकारण थांबवा; अन्यथा ‘सिरम’मधून लस बाहेर जाऊ देणार नाही : शिवसेना

एमपीसी न्यूज  : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जोरात पसरली  आहे. अशा वेळी  महाराष्ट्राला जाणिवपूर्वक कमी प्रमाणात लस देवून महाराष्ट्र शासनास म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेला वेठीला धरले जात आहे.  केंद्र शासनाने भाजपप्रणीत राज्यांना मोठ्या प्रमाणात लस देणे आणि जाणिवपूर्वक महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस देणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.   हे राजकारण थांबवा; अन्यथा सिरम इन्स्टिट्यूटमधून  लस बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.

याबाबत शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, तसेच  शाम देशपांडे, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, विजय देशमुख यांनी केंद्राला निवेदन पाठविले आहे.

शत्रू राष्ट्र पाकिस्तान कायम आपल्याशी छुपे आणि खुले युद्ध करत असताना आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडून पाकिस्तानला लस देणे यात तुमचं बेगडी हिंदुत्व दिसून येतंय. देशातल्या रुग्णापेक्षा पाकिस्तान तुम्हाला जवळचा वाटतोय का?, असा सवालही शिवसेनेने निवेदनात उपस्थित केला आहे.

कोव्हिशिल्ड लस पुण्यात तयार होते. आज पुणे देशात कोरोनाचे हॅाटस्पॅाट बनलेय. पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट मध्ये लस तयार होतेय. येत्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्राला लस  वाढवून दिली नाही तर आम्ही ही लस पुण्याबाहेर जाऊ देणार नाही.  या मागे इतर राज्यामधील नागरिकांना लस मिळू नये हा उद्देश नसून महाराष्ट्राला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्त लस मिळावी हा आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश  जावडेकर,  तुम्ही राजीनामा द्यायलाच हवाय. पुणे व महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आपण केंद्र शासनात गेली सात वर्ष प्रतिनिधीत्व करत आहात, सांगण्यासारखी एकही योजना आजवर तुम्ही आणली नाही.

केंद्रीय पर्यावरणमंत्री असताना  पैसे मंजूर असून सुद्धा तुम्ही जायका प्रकल्पाअंतर्गत मुळा मुठा स्वच्छ करू शकला नाहीत आणि महाराष्ट्र लसीकरणामध्ये देशात क्रमांक एकवर असून देखील लस कमी देण्याचे खोटे कारण जनतेला सांगून महाराष्ट्राशी प्रतारणा करीत आहात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिगत द्वेष व्यक्त करताहात. माध्यमात तुमची प्रतिमा काय आहे हे अर्णव गोस्वामी यांनी दाखवून दिले होते. त्यावेळी महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहिला आता मात्र तुम्ही ‘महाराष्ट्रद्रोह’ करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.