Pune News : हटके स्टोरी ! लॉकडाऊन बंदोबस्तात तीन पायांचा ‘राजा’ करतोय पोलिसांना सोबत

एमपीसी न्यूज – राखणदार, प्रामाणिक, आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे श्वानांची वैशिष्ट्ये मानली जातात. याबाबत अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, चित्रपटात देखील त्यांच्याबद्दल दाखवलं गेलं आहे. असाच एका पायाने अपंग असलेला ‘राजा’ लॉकडाऊन बंदोबस्तात पुणे पोलिसांची सोबत करतोय.

बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी सध्या राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पुणे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मात्र, पोलीस कर्मचारी यांच्या सोबत याठिकाणी आणखी एक ‘स्पेशल पोलीस ऑफिसर’ आहे आणि तो म्हणजे ‘राजा’ नावाचा श्वान ! राजा हा पुढच्या एका पायाने अपंग असून तीन पायांवर तो पोलिसांची सोबत करत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन पासून तो निरंतर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यासारखी याठिकाणी आपली ड्युटी बजावत आहे.

पुणे पोलिसांनी रात्री बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या सोबत बसलेल्या ‘राजा’चा फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीट मध्ये असं म्हटलं आहे की, ‘आमचा एक ‘स्पेशल पोलीस ऑफिसर’ : म्हणजे ‘राजा’! तीन पायांचे श्वान. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये एक जागरूक सहकारी आणि आमच्या अधिकाऱ्यांसमवेत राहणारा खरा मित्र!’

या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी श्वानासह पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. एवढंच नव्हे तर, अभिनेता जॉन अब्राहम याने देखील पुणे पोलिसांचे हे ट्वीट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्या सर्व शक्तीने शहराची सेवा करीत आहे, पुण्यातील तीन पायांचा राजा!’ असं त्यानं ट्वीट केले आहे.

श्वानाच्या प्रामाणिक वागणूकीच्या आणि प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत अनुभवल्या आहेत. अशाच प्रमाणिकपणा आणि प्रेमाचं दर्शन घडवणारी ही राज्याची गोष्ट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.