Pune News : ‘स्थायी’च्या 8 जागांसाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात भाजपचे सहा, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात असलेली स्थायी समिती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या समितीवर नियुक्ती होण्यासाठी अनेक जण अक्षरश: जीवाचं रान करतात. महापालिकेचा कारभार खर्‍या अर्थाने ही समिती हाकत असते. स्थायी समितीमधील सदस्यांची एकूण संख्या 16 आहे. त्यानुसार पक्षीय बलाबलाचा विचार करून स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे भाजपचे 97, राष्ट्रवादी 41, शिवसेना 10, काँग्रेस 10, मनसे 2, एमआयएम 1 निवडून आले आहेत.

पालिकेतील सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीची सूत्रे आहेत. 16 सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यांतील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या 28 फेब्रुवारीला संपत आहे.

त्यामध्ये भाजपचे सहा सदस्य असून, त्यात हेमंत रासने, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, बंडू ढोरे, हिमाली कांबळे यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांचाही कार्यकाल संपणार आहे. या सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सदस्यांची नियुक्ती 16 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांतील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.