Pune News : ‘सुबोधवाणी’ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दालन- भूषण गोखले

एमपीसी न्यूज: “विद्यार्थ्यातील कल्पक, सर्जनशील वृत्तीला प्रोत्साहन देण्याची गरज असते. ‘मएसो सुबोधवाणी’ या वेब रेडिओ केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी नवनवी दालने खुली होतील”, असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले. 72 व्या प्रजासत्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने विज्ञान भारती या संस्थेच्या मदतीने सुरू केलेल्या ‘सुबोधवाणी’ रेडिओ केंद्राचे उद्घाटन गोखले यांच्या हस्ते झाले.

प्रशालेचे माजी विद्यार्थी कमोडोर सुबोध पुरोहित यांच्या स्मृती जपण्यासाठी या रेडिओ केंद्राला सुबोध यांचे नाव देण्यात आले आहे. देशातील मराठी माध्यमाच्या शाळेतील हा पहिला आणि एकमेव वेब रेडिओ आहे.

यावेळेस उद्योजक विश्वास काळे, सुबोधवाणीचे संकल्पक विलास रबडे, विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी, सदस्य रमेश हाते, श्रीकांत कुलकर्णी, श्रीमती नीला पुरोहित, प्रशालेच्या शाळा समिती अध्यक्षा आनंदी पाटील, सदस्य देवदत्त भिशीकर, सुधीर गाडे, अरविंद गायकवाड, श्रीधर करकरे यांच्यासह पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळेस प्रशालेच्या 1970च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी डिजीटल क्लासरूमला भेट दिली.

“भारत आता महासत्ता म्हणून उदयास येत आहे. चीनबरोबरचे युद्ध असो की चायनीज कोरोना या सगळ्या आव्हानांना भारताने समर्थपणे तोंड दिले आहे. धोरणामुळे आर्थिक परिस्थिती वर परिणाम झाला. परंतु या सगळ्यातून आपला भारत देश पुढे चालला आहे. विविधतेतही एकता आपल्या देशाने दाखवली आहे. सुबोध पुरोहित यांचे शौर्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे”, असे भूषण गोखले यांनी यावेळेस सांगितले.

या संधीचा कल्पक व सृजनशील विद्यार्थी-विद्यार्थिनी घडविण्यासाठी फायदा होईल. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक नवे दालन यांमुळे उपलब्ध झाले असल्याचे सुधीर गाडे म्हणाले. यावेळेस विश्वास काळे आणि विलास रबडे यांनी कमोडोर सुबोध पुरोहित यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच, सुबोधवाणीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास आणि विज्ञान प्रसारास मदत होईल, असे विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी यावेळी म्हणाले.

प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती आपण काही देणे लागतो या भावनेतून मित्रांशी संपर्क केला. अरविंद परांजपे, रवींद्र गोडबोले यांनी यांत सहकार्य केले असून रेडीओ कसा सुरु करावा, याचे मार्गदर्शन श्रीपाद कुलकर्णींकडून घेतले आहे. सुबोधवाणीमुळे विद्यार्थी स्वतःला घडवतील, असे विलास रबडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.