Pune News : युवा सेनेच्या मागणीला यश ! बीएस्सी तृतीय वर्षाच्या Chemistry Theory lll विषयाची 3 ऑगस्टला पुन्हा परीक्षा

एमपीसीन्यूज :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान Chemistry lll या विषयाच्या परीक्षेसाठी लॉग इन करुन देखील गैरहजर दाखविण्यात आलेल्या सहाशे विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी या विषयाची परीक्षा 3 ऑगस्टला दुपारी 12 ते 2 या वेळेत आयोजित करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.

याबाबत माहिती अशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या नुकत्याच ऑनलाईन परीक्षा झाल्या. दि .14 जुलै रोजी दुपारी 12  ते 2 च्या दरम्यान झालेल्या BSc तिसऱ्या वर्षाच्या Chemistry lll च्या पेपर वेळी गोंधळ निर्माण झाला होता. 12.05 वाजता ज्या विद्यार्थ्यांनी log in करून पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना त्या पेपरमध्ये गैरहजर (Absent) दाखविण्यात आले. संबंधित विद्यार्थ्यांनी  ऑनलाइन तक्रार नोंदवली.

मात्र, तरीही अद्याप त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थी तणावाखाली होते. त्यामुळे   याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन या सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात  तारीख जाहीर करावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्षाचे ध्यक्ष कुणाल धनवडे, सरचिटणीस परमेश्वर लाड, उपाध्यक्ष विशाल हुलावळे, सचिव दयानंद कोंढरे आणि सहसचिव रोहित कुचेकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती.

तसेच याबाबत परीक्षा संचालक महेश काकडे, परीक्षा विभाग समन्वयक योगेश नेरकर यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली. जवळपास 600 विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अशा सर्व विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे ऑनलाईन परीक्षा संदर्भात माहिती पाठवली जाईल. तसेच ही परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे आश्वासन काकडे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती.

त्यानुसार आता येत्या 3  ऑगस्टला दुपारी 12  ते 2 यावेळेत BSc तिसऱ्या वर्षाच्या Chemistry lll या विषयाची परीक्षा आयोजित केल्याची माहिती काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.