Pune News : बिर्लामध्ये दोन वर्षीय बालकावर गुंतागुंतीची ‘एमआयएस- सी’ यशस्वी शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या बालकावर गुंतागुंतीची मल्टीसिस्टीम इन्फ्लामेट्री सिंड्रोम (एमआयएस- सी) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

कोविड-19 ची दुसरी लाट लहान मुलांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. अनेक चिमुकल्यांमध्ये प्रारंभिक सौम्य लक्षणे आढळून आली. तरीच काही बालकांमध्ये फिट्स, न्यूमोनिया, सर्क्युलरेटरी शॉक इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली. एका लहानग्याला दुर्मीळ आजाराने ग्रासल्याने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील कॅज्यूअल्टी वॉर्डात त्याला 10 एप्रिल रोजी हलविण्यात आले.

त्याला कोविड संसर्ग झाल्याचे अगोदरच निदान झाले होते तसेच, फिट्स येत होत्या आणि तो बेशुद्ध होता. प्राथमिक औषधे देऊनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

चाईल्ड क्रिटीकल केअर स्पेशियलिस्ट डॉ. कौस्तुभ प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकाच्या आरोग्यात कोणतेही मुख्य बदल जाणवत नसल्याने त्याच्या शरीराची कार्ये सुरळीत रहावीत यासाठी आयसीयुमध्ये वेंटीलेटरवर ठेवण्यात आले. औषधांमुळे त्याला येणारे झटके नियंत्रणात आले. सोबत कोरोनाचे उपचारही सुरूच होते. कालांतराने केलेल्या चाचणीत सर्व नियंत्रणात असल्याचे निष्पन्न झाले.

बालक रुग्णालयात भरती झाला तेव्हा त्याच्या शरीरातील सोडियम आणि क्लोराईडची पातळी खालावल्याने त्याला झटके आणि फेफरे येत होते. अँटीडायुरेटीक हार्मोन सेक्रेशन (SIADH) आणि सेलेब्रल सॉल्ट वेस्टींग (CSW) लक्षणे आढळून आल्याने शरीरातील सोडियमची हानी झाली होती. शरीरातील जल पातळी खालावली होती. त्याला अधिक प्रमाणात सोडियम असलेले सलाईन लावण्यात आले. ज्यामुळे लघवीचे प्रमाण स्थिर झाले. तीन दिवसांनी त्याला वेंटीलेटरवरून हलविण्यात आल्याचे चाईल्ड न्यूरोलॉजीस्ट डॉ. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले.

वेंटीलेटरवरून हलविण्यात आल्यानंतर तो झोपाळलेला दिसत होता आणि अंगात ताप होता. त्याचा रक्तदाब देखील खालावला होता. त्याला सलाईन ब्लाऊजेस आणि स्टेरॉईड लस देण्यात आली. त्याच्या पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सचे प्रमाणही खालावले. परिणामी, त्याला प्रतिजैविकाचा उच्च डोस देण्यात आला. त्यामुळे ताप आणि धक्क्यांचे प्रमाण नियंत्रणात आले असे, डॉ. कौस्तुभ प्रभुदेसाई म्हणाल्या.

वेंटीलेटरवरून हलविण्यात आल्यानंतर त्याच्या शरीरातील सर्व इलेक्ट्रोलाईट खालावले. त्यानंतर काही लघवीच्या चाचण्या करण्यात आल्या. आम्ही त्वरीत पूरक उपचार सुरू केले आणि इलेक्ट्रोलाईटचे प्रमाण पुन्हा सुधारले. एमआयएस- सी करिता असलेल्या रक्त चाचण्या करण्यात आल्या. शरीरातील द्रव्यांचे प्रमाण सर्वोच्च आढळून आले. पुढील 24 तासांमध्ये आयव्हीआयजी आणि प्रोटीन टोचण्यात आल्याने ॲसिड प्रमाण कमी झाले. इलेक्ट्रोलाईट स्थिर झाले, असे चाईल्ड किडनी स्पेशियलिस्ट डॉ. मनिष माळी यांनी सांगितले.

यशस्वी उपचारानंतर 21 एप्रिल रोजी बालकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत काही रहस्यमय गुंतागुंत पाहायला मिळाली. काही मुलांमध्ये सातत्याने झटके येणे, अधिक प्रमाणात झोप लागणे आणि चिडचिड होण्याचे प्रमाण वाढले. मागील वर्षभरापासून मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्लामेट्री सिंड्रोम (एमआयएस- सी) आढळून आल्याने संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून आला. कोविडची लागण झाल्यानंतर साधारण 2-4 आठवड्यांनी लहान मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. कोविड संसर्ग लक्षणांसह ही लक्षणेही असतात, असे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील चाईल्ड इंटेन्सीव्ह केअर स्पेशियलीस्ट डॉ. विपुल कुमार गांधी यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.