Pune News : आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देणारा ‘सपोर्ट सर्व्हायवर’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, सोशल मीडियासह अन्य गोष्टीचे व्यसन, खुंटलेला संवाद, त्यातून आलेले एकाकीपण आणि नैराश्यातून थेट आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी ‘कनेक्ट’ महत्त्वाचा असतो. गेल्या 16 वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देण्याचे काम पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था करत आहे.

गेल्या दीड वर्षात कोरोनाने अनेकांच्या जवळची जिवाभावाची माणसे हिरावून नेली. अनेकांचे रोजगार हिरावले; उद्योगधंदे ठप्प झाले. बेरोजगारांच्या संख्येत भर पडली. शाळा-कॉलेज बंद असल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. औषधोपचारांमुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम यामुळे कौटुंबिक ताणतणाव वाढले असून, त्याचे पर्यावसन टोकाचे नैराश्य, हतबलता आणि अपराधीपणाची भावना येत आहे. यातून बाहेर येण्यासाठी सकारात्मकता पेरण्याचे काम कनेक्टिंग ट्रस्ट करत आहे. विनामूल्य हेल्पलाईनद्वारे आजवर अनेकांशी संवाद करत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अर्णवाज दमानिया यांनी मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी 2005 मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो आणि त्यातून आत्महत्येचा विचार येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळाला, मन मोकळे करता आले तर त्यातून या व्यक्ती स्वतःला सावरू शकतात, या विचाराने अर्णवाज दमानिया यांनी ही संस्था सुरु केली.

1) डिस्ट्रेस हेल्पलाइन प्रोग्राम : ज्यांना कोणत्याही प्रकारचा ताण आहे ते हेल्पलाइन क्रमांक 9922004305/9922001122 यावर फोन करून बोलू शकतात किंवा [email protected] या ईमेल वर लिहू शकतात. ही हेल्पलाइन आठवड्याचे सातही दिवस दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत चालू असते.

2) सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम : ज्या व्यक्ती आत्महत्येच्या अनुभवातून गेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा असून, त्यांना 8484033312 या नंबरवर एसएमएस करता येतो. त्यांना संस्थेकडून फोन येतो. ही सेवा दर बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी चालू असते.

3) पियर एज्युकेटर प्रोग्राम : हा कार्यक्रम 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमधे चालू असतो.

4) अवेरनेस (जनजागृती) प्रोग्राम : हा कार्यक्रम समाजातल्या प्रत्येक घटकांना आत्महत्येविषयी जागरूक करतो.

या सर्व सेवा मोफत आहेत. संस्थेचे स्वयंसेवक लोकांना सहानुभूतीने, निरपेक्षपणे ऐकून घेऊन भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात काळजी, भीती, नैराश्य, आत्महत्येचे प्रयत्न, आत्महत्येतून मृत्यू यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले दिसते. या सगळ्याचा परिणाम डिस्ट्रेस हेल्पलाइनच्या कॉल आणि ईमेलच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या एका वर्षात या हेल्पलाइनवर स्वयंसेवकांनी 2427 कॉल्स आणि 717 ईमेलला उत्तर दिले.

सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम हा फील्ड प्रोग्राम आहे. यामध्ये संस्थेतील स्वयंसेवक हॉस्पिटल आणि वस्ती भेटीतून आत्महत्या अनुभवलेल्या व्यक्तींना भावनिक आधार देतात. परंतु कोरोनामुळे हॉस्पिटल आणि वस्ती भेटी काही प्रमाणात बंद झाल्या. सप्टेंबर 2020 पासून या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवेकानी फोनद्वारे आत्महत्या अनुभवलेल्या जवळपास 200 व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना भावनिक आधार दिला. पियर एज्युकेटर प्रोग्राममध्ये ऑनलाइन स्वरूपात तीन शाळांच्या माध्यमातून 920 विद्यार्थी, 178 पालक, आणि 120 शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यातून 160 विद्यार्थी पियर एज्युकेटर म्हणून त्यांच्या मित्रांना भावनिक आधार देण्यास तयार झाले. जनजागृती कार्यक्रमातून 2976 लोकांपर्यंत आत्महत्या आणि तणावाच्या परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. संस्थेतील स्वयंसेवकांचे अथक परिश्रम आणि समर्पणामुळे शक्य झाले.

आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्ट व्हा 
या चळवळीत आणखी लोकांनी येण्याचे आवाहन अर्णवाज दमानिया यांनी केले आहे. अधिकाधिक लोकांना भावनिक आधार देऊन त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर नेण्यासाठी आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग ट्रस्टबरोबर काम करू इच्छिणाऱ्यांनी विक्रमसिंह पवार यांना 7030230033 वर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.