Pune News : सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्हअंतर्गत ‘सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ’ विश्वविक्रमी महोत्सव

30 लोकांच्या मदतीने 7000 किलो मिसळ बनवून तीन तासांत 300 'एनजीओ'मार्फत 30 हजार लोकांना वाटप

एमपीसी न्यूज – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली. ‘सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड 2021’ मध्ये सात तासांत सात हजार किलो मिसळ शिजवण्याचा, तसेच ही तयार झालेली मिसळ तीन तासांत 30 लोकांच्या मदतीने 300 ‘एनजीओ’मार्फत 30 हजार गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वविक्रम झाला.

गिनीज, लिम्का, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स व अन्य रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. ‘सूर्यदत्ता फूड बँक’ आणि ‘सूर्यदत्ता एज्यु-सोशिओ कनेक्ट’अंतर्गत हा उपक्रम झाला. जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनवण्यात आली.

रविवारी पहाटे 2 ते सकाळी 9 या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली. तर सकाळी 9 ते दुपारी 12 या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, 500 किलो कांदा, 125 किलो आले, 125 किलो लसून, 400 किलो तेल, 180 किलो कांदा-लसूण मसाला, 50 किलो मिरची पावडर, 50 किलो हळद, 25 किलो मीठ, 115 किलो खोबरे, 15 किलो तेज पान, 1200 किलो मिक्स फरसाण, 4500 लिटर पाणी, 50 किलो कोथंबीर वापरण्यात आली. त्यातून ही मिसळ झणझणीत, तर्रीदार आणि ठसकेबाज झाली. त्यासाठी 33 बाय 22 चे चुलवण, 10 बाय 10 व 7 बाय 7 साईजची कढई वापरण्यात आली. त्यामुळे परिसराला भव्यदिव्यतेचे स्वरूप आले होते.

“पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम करावा. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नदान करावे आणि आमच्या संस्थेतील हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन आदी विभागाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या महामिसळीचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही महामिसळ तयार झाली. मास्टरशेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महामिसळीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान मिळाले. ” असे ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.

“शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. शिवाय, या आव्हानात्मक काळात विश्वविक्रमी उपक्रम यशस्वीपणे राबविला, यातून या विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळाले, याचा आनंद वाटतो आहे. ‘अनफोल्ड हिडन पोटेन्शिअल थ्रु ब्लाईंडफोल्ड’, ’24 हावर्स सायलेंट रीडेथॉन’, 24 तास विद्यार्थ्यांच्या वाचन, चिंतन, शंकांचे निरसन, 1100 तुळशीच्या रोपांनी भारताचा नकाशा साकारणे, काव्याथॉन 2019 आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील भाषण 1200 मुलांनी वाचन असे सहा विक्रम आजवर झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

आजचा हा विष्णू मनोहर यांच्या साथीने सातवा विक्रम आहे. एनजीओमार्फत झालेल्या वाटपासह बावधन परिसर शहरातील इतर भागातील जवळपास 400 लोकांनी या मिसळीचा आनंद घेतला. सूर्यदत्तामध्ये आलेल्या पाहुण्यांनीही या ठसकेबाज व झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला.”

“सर्वात मोठा पराठा, पाच हजार किलो खिचडी, चार हजार किलो वांग्याचे भरीत, सर्वात मोठा कबाब असे आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. आज प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून खवय्या पुणेकरांसाठी महामिसळ बनविण्याचा विश्वविक्रम झाला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ बनवताना खूप मजा आली. प्रत्येकी विश्वविक्रमावेळी हजारो लोकांची गर्दी असते. यावेळी मात्र, केवळ 25-30 लोकांमध्ये हा विश्वविक्रम झाला. प्रा. डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्यासह ‘सूर्यदत्ता’मधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी या उपक्रमात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. हा विश्वविक्रम लोकांच्या अनुपस्थित कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाल्याने एक वेगळाच अनुभव वाटतो आहे,” अशी भावना मास्टरशेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली.

सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन, सूर्यदत्ताच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी यासह आदी विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विश्वविक्रमात सहभाग नोंदवला. शेफ विष्णू मनोहर, प्रा. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, प्रा. शैलेश कुलकर्णी, सचिन इटकर, प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. प्रतीक्षा वाबळे, प्रा. शेफाली जोशी, समीरा नाईक, प्रा. अजित शिंदे, नयना गोडांबे, प्रा. मंदार दिवाने आदी उपस्थित होते.

या संस्था घेणार विश्वविक्रमाची नोंद
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ रेकॉर्ड, फँटॅस्टिक अचिव्हमेंट अँड रेकॉर्ड, फॅब्युलस रेकॉर्ड्स, इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, रिपब्लिक वर्ल्ड रेकॉर्ड, उत्तरप्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड, युके वर्ल्ड रेकॉर्ड, वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड, होप इंटरनॅशनल रेकॉर्ड, वॉव वर्ल्ड रेकॉर्ड, फॉरेव्हर स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, आसाम बुक ऑफ रेकॉर्ड, बंगाल बुक ऑफ रेकॉर्ड, द वेक ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड, वेक बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल, द ट्रिब्यून इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, रेझर्स रेकॉर्ड, पॉंडिचेरी बुक ऑफ रेकॉर्ड, ड्रीम हाय इंडिया रेकॉर्ड, ड्रीम हाय वर्ल्ड रेकॉर्ड, गुजरात बुक ऑफ रेकॉर्ड, हिंद बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स आदी संस्थांकडून या विश्वविक्रमी महामिसळची नोंद घेतली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.