Pune News : स्वारगेट – कात्रज बीआरटी बस जानेवारीपासून सुरू करणार : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज : स्वारगेट ते कात्रज चौकापर्यंतच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीआरटी मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्गावरून येत्या 1 जानेवारीपासून बस वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या बीआरटी मार्गाची पाहणी महापौर मोहोळ यांनी केली. तसेच महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या समवेत करुन या मार्गाचा ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी बीआरटी सुरु करण्याची घोषणा केली.

पाहणीवेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

स्वारगेट-कात्रज बीआरटीच्या कामाची निविदा 2016 साली काढण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने 2018 साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती.  आचारसंहिता आणि या रस्त्यावररील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे, यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला.

आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेली काही कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आढावा घेतल्यानंतर महापौर मोहोळ म्हणाले, ‘तांत्रिक प्रक्रिया आणि विविध बाबींमुळे हे काम लांबले असले तरी आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काम योग्यरित्या पूर्ण झाले असून 1 जानेवारीपासून हा मार्ग खुला करण्यात येत आहे.

या मार्गाचा फायदा या भागातील नागरिकांना उत्तमरीत्या होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.