Pune News: रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा – बालगुडे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येवू नये. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे  करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस ॠषीकेश उर्फ आबा बालगुडे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात  बालगुडे यांनी म्हटले आहे की,  शहरातील मध्यवर्ती भागामध्ये ड्रेनेज, 24-7 पाणी पुरवठा यांची कामे चालू आहेत. ही कामे करीत असताना रस्त्यावर राडारोडा, पाईप, माती तशाच आहेत. ही कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे  पाहायला मिळत आहे. महापालिकेने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे. या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत. रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे महापालिकेमुळे नागरिकांचा जीवीतास धोका निर्माण झाला आहे, अशी  परीस्थीती शहरात आहे. नागरिकांनी याची तक्रार  पथ आणि ड्रेनेज विभाग यांच्याकडे करूनसुद्धा त्याच्याकडे अधिकारी कानाडोळा करून संबधित ठेकेदार यांना पाठीशी घालून कामे निकृष्ट  दर्जाची करून घेत आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्ते खचणे, रस्त्यावर पाणी साचणे हे प्रकार घडणार आहेत.

 

रीईनस्टेटमेंटच्या नावाखाली चुकीची कामे केली जात आहेत. शहरातील खोदाई झालेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्याऐवजी त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट केले जाते. हे  व्यवस्थित केले जात नाही, यामुळे रोड खचणे व त्यावर डांबर टाकणे असा प्रकार पथ विभाग आणि ड्रेनेज विभाग यांच्याकडून होत आहे. एक काम दोन ते तीन वेळा करण्याचे प्रकार घडत आहेत. या विषयी 27 जानेवारी  रोजी तक्रार केलेली आहे.  यावर त्वरित कारवाई  करण्यात यावी,  अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.