Pune News: जम्बो कोविड हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाबाबत खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा – महापौर मोहोळ

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या बैठकीत महापौरांची मागणी

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये सोई-सुविधांची कमतरता असून पुणेकरांच्या मोठ्या तक्रारी येत आहेत. शिवाय केवळ 330 बेड्स उपलब्ध असतानाही रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

पुण्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जम्बो रुग्णालयात रुग्ण दाखल करायला सुरुवात केल्यापासून मोठ्या तक्रारी येत आहेत. शिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यूही कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने झाला होता. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी लक्ष वेधून ‘जम्बो’च्या समस्या मांडल्या.

जम्बोबाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसोबत मुद्दे मांडताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असनातानाही गंभीर रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या टक्केवारी खाली आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत.

टेस्टिंगसंदर्भात खासगी लॅबमध्ये RT-PCR ची संख्या जास्त असली तरी सरकारी लॅबमध्ये कमी आहे. तातडीने वाढवण्यात यावी. शिवाय खासगी लॅबबाबत अजूनही म्हणावा तसा समन्वय दिसत नाही, तोही आवश्यक आहे, असे मोहोळ म्हणाले.

‘शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती अजूनही हाताबाहेर गेली नसून मात्र आताच्या परिस्थितीत सुविधा देणे आवश्यक आहे. शिवाय पुणे महापालिकेला आर्थिक मदत राज्य सरकारने करावी, अशीही मागणी केल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.