Pune News : वाझे यांच्या आरोपप्रकरणी मोक्कानुसार कारवाई करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राहुल नार्वेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संदीप लेले या प्रसंगी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, परमबीर सिंग, वाझे या पोलीस अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे.या बाबतचे सबळ पुरावे सादर झाले तर या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. वाझे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याऐवजी मंत्री अनिल परब यांनी एनआयए, सीबीआय समोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे.

पाटील यांनी सांगितले की, कोरोना स्थिती हाताळण्यात आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. लसीकरण कार्यक्रमाचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. मात्र केंद्राकडून दिल्या गेलेल्या लशींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातून राज्याचा खोटेपणा उघड झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.