Pune News : कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करा : दिपाली धुमाळ

एमपीसी न्यूज : गेल्या 9 महिन्यांपासून पुणे शहरात कोविड 19 अर्थात कोरोना विषाणुच्या संसर्गाविरोधात उपाययोजना केल्या आहेत. परंतु दिल्ली येथे कोरोनाची दुसरी लाट सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने विविध उपाययोजना आखत सज्ज राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

पुणे शहरात कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 65 हजाराहून जास्त झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

परंतू परदेशात कोरोनाची दुसरी लाट येवून त्याठिकाणी लॉकडाऊन केल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच दिल्लीमध्ये देखील कोरोनाचे रूग्णवाढीचे प्रमाण वाढत त्याठिकाणी देखील लॉकडाऊन करणे विचाराधीन आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरातील रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्याने रूग्णांची गैरसोय झाली होती, ही वस्तुस्थिती आहे. तसेच नर्सेस, टेक्निशियन, डॉक्टर्स व इतर आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याने देखील रूग्णांचे हाल झाले होते. या सर्वांची 45 दिवसांच्या कालावधीकरिता नेमणूक केलीली होती. त्यांचा देखील कार्यकाळ वाढविण्याबाबत योग्य ती पावले उचलण्यात यावीत.

महापालिकेने कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष, तसेच जम्बो सेंटर्सची उभारणी केली आहे. सदयस्थितीत काही कोविड सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. परंतु दुसरी लाट पुणे शहरात आल्यास प्रचंड गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. याविषयी नियोजन व आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेचे पदाधिकारी, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलविण्यात यावी.

तसेच अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर्स या सर्व बाबी पूर्ण नियोजनासह सज्ज राहावे, अशी विनंती पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी लेखी निवेदनाद्वीरे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.