Pune news: ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा’ – बलदेव सिंग

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा घेतला.

यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा चे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, सोलापूर चे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकी अंतर्गत मतदान व मतमोजणीसाठीची तयारी वेळेत पूर्ण करा. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करा. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. बोगस मतदान होऊ नये, यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मतदान केंद्रावर पडताळणी दरम्यान बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी. निवडणूकीचे कामकाज शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाव्यात. योग्य नियोजन करुन समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत.

कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्या. मतदानासाठीच्या रांगेत सामाजिक अंतर राखले जाईल, यासाठी नियोजन करा. केंद्राच्या ठिकाणी हँड वॉश, सॅनिटायझर, साबण, हॅन्ड ग्लोव्हज, व अन्य आवश्यक साहित्य गरजेनुसार वेळेत पुरवले जाईल, याची दक्षता घ्या. मतपत्रिका व मतदानाचे साहित्य वेळेत संबंधितांच्या ताब्यात द्या, असे सांगून निवडणूक विषयी पूर्ण झालेली कामे व उर्वरित कामकाजाचा सिंग यांनी आढावा घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.